‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’ अशा या राकट देशाचा आघाडीचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कुठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत.
या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं. गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके. महाराजांनी आपल्या शौर्याने उभारलेले गड , किल्ले आज आपण प्रत्यक्ष जावून पाहू शकतो परंतु तेच गड आणि किल्ले आधुनिक स्वरुपात त्यांच्या योग्य त्या माहितीसह एकाच ठिकाणी या शिवसृष्टीत पाहायला मिळतात. त्रिमितीय स्वरूपातील हे किल्ले प्रत्येकाचे लक्ष नक्कीच लक्ष वेधून घेत आहेत.
या गॅलरीमध्ये रायगड, सिंहगड, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड यांसारख्या महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती दाखवल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने, किल्ल्याचा प्रत्येक भाग प्रकाश आणि दृश्यांसह स्थित आहे आणि कथेचा ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व दिसून येत आहे. या किल्ल्यांची संरचना , संरक्षण व्यवस्था, पाणी व्यवस्थापन आणि सांस्कृतिक पैलूंबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. आपण या प्रारुपाच्या गुंतागुंतीच्या तपशीलांची आणि कारागिरीची माहिती देखील करू शकता. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अनुभवू इच्छिणाऱ्या पर्यटकांनी हा "दुर्गवैभव" नक्कीच अनुभवावा.