"रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र नुकतंच लिहून पूर्ण केला असून शेवटचा शब्द लिहिल्यानंतर क्षणभराने ते आज्ञापत्राची वही बंद करतात. या वहीच्या मुखपृष्ठावर "आज्ञापत्र" असं ठळक अक्षरात लिहिलेलं असतं. या सुरुवातीच्या प्रसंगात केवळ वही दिसत असून हळूहळू कॅमेरासमोर अमात्य बसलेले आहेत असं दिसतं. क्षणभर वहीकडे पाहिल्यानंतर अमात्य कॅमेराकडे पाहून स्वगत सांगू लागतात..
'आज्ञापत्र'.. खरंतर हा बोली भाषेतला शब्द असला तरी हे काही एक आज्ञापत्र नाही. आमच्या थोरल्या पुण्यश्लोक शिवछत्रपती महाराजांनी उभ्या आयुष्यात जी काही शिकवण आम्हाला दिली ती शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत जशीच्या तशी नेण्यासाठी मी हा ग्रंथ नुकताच पूर्ण केलाय. काय म्हणालात, मी कोण? मी रामचंद्र निळकंठ. थोरले शिवछत्रपती महाराज मला 'रामचंद्रपंत' म्हणायचे. आमचे तीर्थरूप निळोपंत म्हणजे महाराजांचे खास स्वराज्याच्या सुरुवातीपासून महाराजांची सेवा केलेले. त्यांच्याकडून आम्हा भावांना कायम महाराजांबद्दल ऐकायला मिळायचंच. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनी विश्वासाने आमच्या हाती अमात्यपद दिलं आणि या आमच्या राजाचे अनेक नवे पैलू दर दिवशी आमच्यासमोर उलगडू लागले. कसे होते महाराज? त्यांनी आणि त्यांच्या जिवलगांनी काय केलं की आज, महाराजांच्या निर्वाणानंतर 34 वर्षांनीदेखील मला हे पुढच्या पिढ्यांना सांगावं वाटतंय? सांगतो.. माझ्या डोळ्यांसमोरून ती तेजस्वी मूर्ती काही केल्या हटत नाही. आजही सगळं लख्ख आठवतंय..
....................हा अनुभव केवळ तुम्हालाच पाहायला मिळेल तो या शिवसृष्टीत."