शस्त्र प्रदर्शन

03 Apr 2023 15:39:02

Shivsrushti Pune Arms and Armours
 
शस्त्रे आणि शस्त्रास्त्रे दालन : शिवकालीन शस्त्रे आणि शस्त्रास्त्रे ही मोठी संपत्ती शिवसृष्टीत आपल्याला पाहायला मिळतील. पोलादी जाळीदार चिलखत, दस्तान, मराठा आणि मुघल इतिहासाशी संबधित परंतु सध्या परदेशी संग्रहालयात असलेल्या वस्तूंच्या प्रतिमा, शाहजहान यांचा मद्याचा चषक, मराठा धोप तलवार, मुल्हेरी धोप तलवार, मराठा चक्र धोप तलवारीचे विविध प्रकार, जाळीदार मुठीच्या चक्रधर धोप तलवार, दाक्षिणात्य तलवार ज्याची मुठ हस्तिदंत असते, तेगा तलवार, फिरंग धोप तलवार, जगदंबा तलवार, इराणी तलवार, वाघनखं, कट्यार, खांडा, इराणी भाला, सांग, इटं, ठासणीच्या बंदुका, कडाबिनी, गुप्ती यातील कित्येक शस्त्रास्त्रांची तर नावे सुद्धा आपल्यापैकी अनेकांनी क्वचितच ऐकली असतील. ही सर्व शस्त्रास्त्रे आपल्याला इथे पाहायला मिळतील.

शिवसृष्टीमध्ये एक आकर्षक दालन आहे जे तुम्हाला 17 व्या शतकात परत घेऊन जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे साक्षीदार बनवेल. शस्त्रे आणि चिलखत हे शिवाजी महाराजांच्या काळातील किंवा 17व्या शतकातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे हे दालन आहे. तुम्हाला एकाच दालनात मराठा, मुघल आणि दक्षिण भारतीय शस्त्रे पाहता येतील. तसेच वाघनख्यांसारखी काही महत्वाची शस्त्रे त्रिमिती स्वरुपात प्रदर्शित केली आहेत.

तलवार : तलवार हे राजघराण्यातील लोकांचे भुषण होते. शिवाजी महाराजांचे हे प्रमुख हत्यार होते. मराठा तलवारी हया विशेष बनावटीच्या होत्या प्रमुख व निवडक महाराजांच्या मर्जीतील लोकांना ख़ास मराठा धोप मानाच्या पोषाखासोबत दिल्या जात.

कट्यार : हे तुलनेने लहान असल्याने वागवणे सोपे होते. कायम सोबत ठेवता येते. मुठीच्या रचनेमुळे हातातून सुटणे अशक्य असते. या शस्त्राचा प्रसार व्हिएतनाम ते अफगाणिस्तान पर्यंत झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आवडते शस्त्र होते. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार असायची. मराठा साम्राज्यातही सरदार आणि दरबारच्या मानी सरदारांनाच कट्यारीचा मान होता.

बिचवा : हे एक चाकू सारखे शस्त्र आहे. खुपसल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचे जास्तीतजास्त नुकसान व्हावे म्हणुन यास वळणदार आकार देण्यात येत असे. त्याने जखमेची लांबी वाढण्यास मदत होई. हे एक दुधारी शस्त्र आहे. शस्त्रांमध्ये सर्वात लहान शस्त्र म्हणून बिचवा हे शस्त्र आहे.

भाला :भाला हे लांब दांडीचे शस्त्र आहे. सहसा यात बांबूपासून किंवा लाकडापासून बनवलेल्या लांबलचक दांडीवर धातूचे पाते बसवले असते. युद्धात शत्रूवर चाल करून जाऊन भोसकण्यासाठी किंवा काही वेळा शत्रूवर दूर अंतरावरून फेकून मारा करण्यासाठी हा वापरला जाई. घोडदळाच्या वापरातील भाले पायदळाच्या भाल्यांपेक्षा वजनास भारी व अधिक पल्लेदार दांड्यांचे बनवलेले असतात.

दांडपट्टा दांडपट्टा किंवा पट्टा हे तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल अशा बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.

वाघनखं हे मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे हत्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.

खंजीर :खंजीर हा तलवारीपेक्षा लहान पण आकाराने साधारण तसाच शस्त्रप्रकार. अटीतटीच्या प्रसंगी स्वसंरक्षणाचे किंवा प्रसंगी लपून हल्ला करण्याचे हत्यार म्हणून त्याचा वापर होत असे. त्याच्या लहान आकारामुळे तो अंगरख्यात लपवणे सहज शक्य होत असे. हातघाईच्या लढाईत खंजिरासारख्या शस्त्रांना अत्यंत महत्त्व आहे. प्रतापगडावरील भेटीत अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजिराने वार केला होता पण केलेला पण चिलखतामुळे तो हुकला.

गुप्ती :गुप्ती हे गुप्त शस्त्र आहे. ज्या ठिकाणी शस्त्र नेण्यास बंदी आहे पण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शस्त्र जवळ असणे आवश्यक असते त्यावेळी जे गुप्त शस्त्र नेले जाते ते शस्त्र म्हणजे गुप्ती. गुप्ती ही एक प्रकारची तलवारच असून काठी सारखी म्यान असल्याने ती पटकन लक्षात येत नाही वेळप्रसंगी या काठीने प्रहार करता येतो. काही कमी प्रसंगात गुप्ती वापरली जाते. ही तलवार काठीत लपवली असल्याने तिला स्वॉर्डस्टिक म्हणतात . शिवसृष्टी संग्रहालयात शस्त्रे आणि चिलखत पाहण्याची आणि जुन्या काळातील रोमांच आणि वैभव अनुभवण्याची ही संधी गमावू नका.
 
Powered By Sangraha 9.0